

ग्राम पांढरी व गल्लाटोला येथे वनहक्क कायद्याबाबत जागरूकता कार्यक्रम संपन्न
सालेकसा : तालुक्यातील ग्राम पांढरी आणि गल्लाटोला येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जिल्हा गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनपीपल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने वनहक्क अधिनियम 2006 अंतर्गत सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण आणि शिवारफेरीचे बुधवारला आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CRRMC) आणि ग्रामसभा सदस्यांचे सक्षमीकरण करणे हा होता.
कार्यक्रमात वनहक्क कायद्यातील अधिकार, जबाबदाऱ्या आणि ग्रामसभांच्या कल्याणासाठी कायद्यातील तरतुदींनुसार कामांचे नियोजन यावर मार्गदर्शन करण्यात आले. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (ग्रामसभा), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, संबंधित शासकीय विभाग, तसेच विविध सामाजिक संस्थांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग होता.
या कार्यक्रमाला ग्रामसभा पदाधिकारी सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, तालुका समन्वयक आदिवासी विभाग, जिल्हा समन्वयक जितेश माहुले, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, वनपीपल फाउंडेशनचे संचालक ललित भांडारकर, तसेच वनपीपल फाउंडेशनचे संचालक कामेश भोरजारे यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणाद्वारे ग्रामसभा सदस्य आणि समिती पदाधिकाऱ्यांना वनहक्क कायद्याची सखोल माहिती मिळाली, ज्यामुळे ते आपल्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतील.






