

आजोबाच्या कार्याची आठवण म्हणुन त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजाला मयत शिडी (थिरडी) भेट._
गावाकडं मोठी माणसं कसं राहतात, समाजासाठी कसं झटतात, हे पाहायचं असेल तर आपले आजोबा स्व. कवडूजी कावरुजी पाटील गेडाम हे उत्तम उदाहरण ठरतं. साधी राहणीमान उच्च विचार सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती त्यांचं संपूर्ण जीवन संघर्ष व एक पाऊल पुढे चालत समाजासाठी काही ना काही करण्याची नेहमी धडपड असायची त्यांनी मच्छीमार सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी ही पदे भुषविले. तर समाजाच्या भल्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी घडवल्या. वैनगंगा नदीच्या पुलाआधी घाटकरी म्हणून त्यांचा लौकिक होता. आणि समाजासाठी त्यांचा सदैव प्रभाव होता.
त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आजही आठवला की मन भारावून जातं. एकदा पंढरपूर यात्रेला निघाले त्यावेळी ते वाट चुकले. व गेलेल्या ग्रुपमधून एकवटले तेव्हा ग्रुपनी गेलेल्या लोकांनी शोधाशोध केली.सोबत गेलेल्या लोकांना चिंता वाटली की त्यांचे कडे खिशात पैसे कमी,अशावेळी वारी च्या माध्यमातून मन मात्र मोठं करत. विठोबाच्या नावानं त्यांनी मार्ग काढला. कशाचंही टेंशन न घेता, संकटांवर मात करत ते सुखरूप परतले. त्यांच्या या प्रसंगातून शिकण्यासारखं खूप आहे – जिद्द, श्रद्धा आणि समाजासाठी काहीतरी करायचं या वृत्तीचं.
आज त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या समाजकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, मी दिवाकर गेडाम तसेच गेडाम परिवाराच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने मयत शिडी (थिरडी) समाजासाठी अर्पण करत आहे. समाजासाठी काहीतरी देणं हेच आपलं कर्तव्य आहे, आणि आजोबांनी घालून दिलेल्या वाटेवर चालत हे कार्य करण्याचा आनंद आहे. त्यांचं जीवन आणि कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, आणि ही सेवा करताना त्यांचा आशीर्वाद सतत सोबत आहे.
वैनगंगा नदीवरील घाटकरी समाजाचं गौरवशाली योगदान: एक चिंतन
कधीकाळी वैनगंगा नदीवर पूल नव्हता. त्या वेळेस घाटकरी समाजातील आपल्या ढिवर बांधवांनी नावांच्या मदतीनं लोकांना सुरक्षित नदी पार करून द्यायचं काम केलं. हे फक्त काम नव्हतं, तर सेवा होती. घाटकरी लोकांचं आयुष्य नदीशी घट्ट जोडलेलं होतं. या समाजाने त्याच्या मेहनतीच्या जोरावर केवळ स्वतःचा नव्हे, तर इतरांचाही संसार उभा केला. पण हळूहळू काळ बदलला, नवे पूल आले आणि घाटकरी समाजाचं पारंपरिक काम मागं पडलं.पूर्वी आपल्या ढिवर समाजात एकजूट होती. सगळे मिळून राहायचे, शेती असायची, उपजीविकेसाठी लागणारं सगळं स्वतःच्या कष्टानं मिळवायचे. त्यामुळं समाज मजबूत आणि समाधानी होता. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. रोजगाराच्या नवीन संधी मिळाव्यात, समाजाच्या प्रगतीसाठी पावलं उचलली जावीत, यासाठी विचार करायला हवा. आज घाटकरी समाजाच्या भल्यासाठी नव्या पिढीनं पुढे यायला हवं.
आजच्या तरुण पिढीनं जुन्या काळातल्या संघर्षातून शिकून, नवीन संधी शोधून आपला समाज अधिक सशक्त बनवावा. आपली ओळख, आपली संस्कृती जपायला हवी. एकत्र येऊन, एकमेकांना मदत करून घाटकरी समाजाचं भविष्य उज्ज्वल करायला हवं. हीच खरी आपल्या वडिलधाऱ्यांना आदरांजली ठरेल.
आपला
दिवाकर रामदास गेडाम
ग्रामपंचायत सदस्य तथा मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख.






