

सालेकसा : बाजीराव तरोने
तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय शाळा, तिरखेडी येथे डिजिटल शिक्षणाची नवी दिशा खुली झाली आहे. आमदार अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून शाळेला संगणक संच प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी उपयोग करता येणार आहे.
तिरखेडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय शाळेला आमदार अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून एक संगणक संच प्राप्त झाला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे, तिरखेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिया शरणागत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कटरे यांचे विशेष प्रयत्न लाभले.
शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. जाधव तसेच शिक्षक एस. बी. कुंभरे, चेतन राठोड, निशांत रहांगडाले, मैना मोरे व लक्ष्मीकांत तुरकर यांनी यासाठी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
हा संगणक संच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यांच्यातील डिजिटल कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील शाळेत असे तांत्रिक साधन उपलब्ध होणे ही एक स्वागतार्ह बाब मानली जात आहे.






