डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला हलबिटोला शाळेत उत्साहात साजरा – विद्यार्थ्यांनी उचलला समाजप्रबोधनाचा वसा

0
283
1

सालेकसा  – जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, हलबिटोला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव तरोने होते. त्यांच्यासह उपाध्यक्ष सविता घरडे, श्वेता घरडे, ललित किरसान, रचना गोंडाने, मुख्याध्यापक वाय. डी. अंबादे, तसेच सहायक शिक्षक राजेश भोयर, डी.एम. हरिनखेडे, कु. एस.एम. जाधव, एम.एस. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात बाजीराव तरोने यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडताना “शिक्षण हेच जीवनाचे खरे साधन आहे” या त्यांच्या विचाराचे स्मरण करून दिले.

या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी चावडी वाचनाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र उलगडले. वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे संचालन डीलेश्वरी करंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी.एम. हरिनखेडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी योगदान दिले.