प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील चांदपूर परिसरात गत काही दिवसांपासून वाघाने सोंड्या, वारपिंडकेपार, बिनाखी, सक्करधरा, टेमनी, मोहाडीखापा व मुरली या गावात धुमाकूळ घातला होता तर शेतकऱ्यांना व नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांत व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान 14 एप्रिलच्या पहाटे मुरली येथे वाघाने एका वासराची शिकार केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.सदर मागणीची दखल घेत वन विभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करून 14 एप्रिलला रात्रीच्या सुमारास त्या वाघाला अखेर जेरबंद करून निसर्गाच्या अधिवासात सोडून दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

