
ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे २६ एप्रिल रोजी पंचायत समिती सभागृहात होणार राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व पत्रकारांचा गौरव
गोंदिया : ५ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेली ‘I Am Winner’ व २ मार्च रोजी पार पडलेली ‘Winner of the Year’ ही राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेतील जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी व कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचारी यांचा भव्य गौरव सोहळा दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती, गोंदिया येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती ध्येय प्रकाशन अकॅडमीचे गोंदिया जिल्हा प्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सुदाम शेंडगे आणि ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका सौ. अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विनोद अग्रवाल असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम (भाप्रसे), जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सुरेश हर्षे, पंचायत समिती गोंदियाचे सभापती मुनेश रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) चे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीमती सरस्वती सूर्यवंशी, गट विकास अधिकारी आनंदराव पिंगळे, अधिव्याख्याता पुनम घुले, डॉ. भाऊराव राठोड आणि सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थी सन्मान यादी:
‘I Am Winner’ परीक्षेत नागपूर विभागीय गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थी, जिल्हास्तरावर ४८, तालुकास्तरावर ३६, केंद्रस्तरावर ५० विद्यार्थी तर ‘Winner of the Year’ परीक्षेत राज्यस्तर केंद्र टॉपर ४७ आणि जिल्हास्तर गुणवत्ता यादीतील ३६ विद्यार्थी यांना एकूण २२१ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
उपरोक्त कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, डाएटचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, डॉ. महेंद्र गजभिये, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, केंद्रप्रमुख निशा बोदेले, समग्र शिक्षेचे बालरक्षक समन्वयक कुलदीपिका बोरकर, गटसमन्वयक सुनील बोपचे, विषय साधन व्यक्ती सुनील ठाकूर, समावेशित तज्ञ जगदीश राणे, विशेष शिक्षक विनोद फुंडे यांचा गौरव होणार आहे.
विद्यार्थी गुणवत्ता वृद्धीसाठी कार्यरत शिक्षक – नरेंद्र अमृतकर (देवरी), नरेंद्र गौतम (गोंदिया), बंद हायस्कूलला पुनरुज्जीवन देणारे मंगलमूर्ती संयाम (देवरी), संजय वैद्य (गोरेगाव), धनंजय रामटेके (आमगाव), सुरेंद्र भैसारे (अर्जुनी मोर), शुभांगी चौधरी (तिरोडा), योगधन मांढरे (सडक अर्जुनी), योगराज राऊत (सालेकसा)प्रगल्भ व उपक्रमशील शिक्षक यांचा सम्मान होणार आहे.
लोकमतचे ज्येष्ठ गोंदिया जिल्हा वार्ताहर नरेश रहिले, न्यूज प्रभात मिडियाचे संपादक व सकाळचे आमगाव तालुका प्रतिनिधी धनराज भगत, देशोन्नती गोरेगावच्या प्रतिनिधी व महाराष्ट्र रत्न पुरस्कार विजेती सौ. कविता लिचडे, बेरार टाईम्सचे मुख्य संपादक खेमेंद्र कटरे, तसेच अनाथांची माय म्हणून ओळखले जाणाऱ्या समाजसेविका प्रा. डॉ. सविता बेदरकर यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे घेतला जाणारा हा उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.


