

३ मे रोजीच्या वादळी गारपिटीने ८५% आंबा फळ गळाले; शेतकरी हवालदिल;नुकसानभरपाईची मागणी
आमगाव : आज दुपारी ३.३० वाजता आलेल्या अवकाळी पाऊस, जोरदार गारगोटी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आमगाव तालुक्यातील वळद, सोनेखारी, येरमडा, कटंगटोला,बोरकन्हार-पाउळदवना व शिवनटोला परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास ८५% आंबा फळे झाडावरून गळून पूर्णतः जमिनीवर भुईसपाट झाली असून अनेक झाडांचे खांदेही तुटले आहेत.

या नैसर्गिक संकटामुळे किशोर महेंद्रभाऊ राहंगडाले, ममता किशोर राहंगडाले, गजेंद्र महेंद्रभाऊ राहंगडाले (१८ एकर, वळद), हनसलाल दादुलाल पारधी (१ एकर), संतोष गजानन पारधी (१ एकर), हरिचंद कान्हू नेवारे (१ एकर), प्रकाश राहंगडाले (२ एकर, येरमडा), विनोद कन्नमवार (१ एकर, सोनेखारी), हिरदीलाल तिजुलाल पटले (१ एकर, कटंगटोला) आणि संदीप गजेंद्रसिंह येळे (२.५ एकर, शिवनटोला),डॉ श्रीराम मधुसूदन भुस्कूटे बोरकन्हार (५ एकर),उषादेवी लखनसिंह कटरे बोरकन्हार,(२ एकर)या बारा शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे जबरदस्त नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, “आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, फळं तोडण्याच्या काही दिवस आधीच निसर्गाच्या लहरीपणाने आमचे संपूर्ण वर्षभराचे श्रम वाया गेले. सरकारने आमची तात्काळ दखल घ्यावी.”
या सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शासन व कृषी विभागाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडूनही करण्यात येत आहे.






