

कट्टीपार येथे विजेचा खांब कोसळून गोठा उद्ध्वस्त; शेती संकटात, नुकसान भरपाईची मागणी
आमगाव : कट्टीपार येथील शेतकरी श्रावण गणू मेंढे यांच्यावर निसर्गाचे मोठे संकट कोसळले. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे त्यांच्या शेतालगत उभा असलेला विद्युत खांब कोसळला. या दुर्घटनेत विजेच्या तारेचा झटका बसून मेंढे यांचा एक बैल जागीच मृत्युमुखी पडला. याशिवाय गोठ्याची छप्परही जमीनदोस्त झाली असून नुकसान झाले आहे.
श्रावण मेंढे हे शेतकरी असून, बैल हे त्यांच्या शेतीचे मुख्य आधार होते. आगामी काही दिवसांत शेतीच्या मशागतीची कामे सुरू होणार असताना बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुबार संकट आले आहे. एका बाजूला गोठ्याचे पडझड झाले असून दुसऱ्या बाजूला बैलही गमवावा लागला आहे.

घटनेनंतर गावातील काही नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बैलाला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. विजेच्या खांबांची स्थिती गावात अनेक ठिकाणी धोकादायक बनली आहे, याकडे यानिमित्ताने पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
या दुर्घटनेनंतर श्रावण मेंढे आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. संबंधित वीज वितरण कंपनीने आणि महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.






