

समाजसेवेचा प्रवास आणि जीवनकार्याचा गौरव; ग्राहक पंचायत आमगावच्या वतीने सन्मान
आमगाव : शहरातील ख्यातनाम भारत स्टुडिओ फर्मचे माजी संचालक आणि समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असलेले संतोष पुंडकर यांचा ६५ वा वाढदिवस अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा आमगावतर्फे अत्यंत उत्साही आणि सन्माननीय पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संघटन मंत्री जगदीश शर्मा यांच्या हस्ते संतोष पुंडकर यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून झाली. या प्रसंगी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष वसंत मेश्राम, सचिव लक्ष्मण खंडाईत, कोषाध्यक्ष बेनेश्वर कटरे, डॉ. अनिल मुंजे, रमेश लिलहारे, प्रदीप बिसेन, मिथुन गुप्ता व नरेंद्र बहेटवार यांची उपस्थिती लाभली.
वाढदिवसानिमित्त वसंत मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुंडकर यांच्या समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले व त्यांना निरोगी, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमातील वातावरण अत्यंत आत्मीय आणि प्रेरणादायी होते.
संतोष पुंडकर यांचे कार्यक्षेत्र केवळ व्यावसायिक मर्यादांपुरते सीमित न राहता सामाजिक परिवर्तनाच्या कार्याशी निष्ठेने जोडलेले आहे. त्यांच्या सेवा कार्याबद्दल जनमानसात विशेष आदराचे स्थान निर्माण झाले आहे.






