पक्षासाठी काम करा, पक्ष तुमचं लक्ष ठेवणार – प्रफुल्ल पटेल यांची ग्वाही

0
211
1

नागपूर येथे झालेल्या विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचे निर्देश

नागपूर : आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तुम्ही पक्षासाठी काम केले, तर पक्ष तुमच्याकडे लक्ष ठेवणार आणि कुठलीही मदत लागल्यास खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. नागपूर येथील परवाना भवन येथे झालेल्या विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी माजी मंत्री धर्मबाबा अत्राम, आमदार संजयभाऊ खोडके, आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राजेंद्र जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संघटनात्मक परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. “प्रत्येक जिल्ह्यात क्रियाशील सभासद नोंदणी किती झाली याची आकडेवारी आमच्याकडे आहे. ही आकडेवारी पाहता कोण किती कार्यरत आहे, हे स्पष्ट होते. आता वेळ आहे की कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी लोकांमध्ये जावे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, जेणेकरून सामान्य जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष असल्याची जाणीव होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभासद नोंदणी अभियान त्वरित राबविण्याच्या सूचना देत जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पक्षासाठी काम करताना येणाऱ्या अडचणी, अडथळे याविषयीही कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याशी संवाद साधला. या समस्या सोडविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यकर्त्यांचा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पक्ष संघटन निश्चितच अधिक बळकट होणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकजुटीने, समर्पणभावाने आणि संघटनेच्या आदेशानुसार काम केल्यास कोणतीही निवडणूक जिंकणे अशक्य नाही, असा आत्मविश्वास या मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात जागृत झाला.