आंदोलनाचा एल्गार: आमगाव भूमी अभिलेख विभागाचा बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ

0
524
1

तांत्रिक वेतनश्रेणी, पदोन्नती व अन्य मागण्यांसाठी २६ मेपासून कर्मचारी संपात सहभागी

आमगांव : तांत्रिक वेतनश्रेणी, पदोन्नती आणि इतर प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे विभाग संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपास आमगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. २६ मे २०२५ पासून त्यांनी अनिश्चित कालावधीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

“जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम इशारा प्र. भू. अधिकारी अनिल द. पटले यांनी दिला. पुणे विभागीय संघटनेच्या १५ मेपासून सुरू असलेल्या बेमुदत संपाला आमगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला आहे.

केंद्रीय संघटनेच्या २० मे २०२५ रोजीच्या सूचनेनुसार, आमगाव कार्यालयातील खालील सात कर्मचाऱ्यांनी आपली सहमती दर्शवून संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे:

याप्रसंगी संपात सहभागी अनिल द. पटले (परिरक्षण भूमापक अधिकारी),बाबूलाल मो. रहांगडाले (प.भू.), अतिफ ल. बेग (नि.म) ,सचिन र. चव्हाण  (भूमापनकार ),नरेंद्र एस.पारधी,(भूमापनकार),नंदकिशोर एम. गौतम (दप्तरबंद),अरविंद तु. मडावी (शिपाई) आदि कर्मचारी यांचा समावेश आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की अनेक वर्षांपासून वेतनश्रेणी, पदोन्नती, कर्मचारी धोरण यासारख्या मूलभूत मागण्यांकडे शासनाने वेळोवेळी केवळ आश्वासने दिली असून प्रत्यक्ष कृतीचा अभाव आहे. त्यामुळे संघटनेच्या आवाहनानुसार बेमुदत संपात उतरावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

या आंदोलनामुळे महसूल प्रशासनातील नियमित सेवा व कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी सरकारला विनंती केली आहे की, तातडीने निर्णय घेऊन कामकाज सुरळीत व्हावे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली निघावेत.