धम्मगिरीसमोरचा ‘माता नगर’ लेआऊट पावसात धसकटला!

0
315
1

आठ वर्षांपासून दुर्लक्षित परिसरात नागरिकांचा संताप — “ह्या नगरचं कुणी वाली नाही का?”

आमगाव : नगरपरिषदेच्या हद्दीतील धम्मगिरी समोरील माता नगर लेआऊट हे वसाहतीचे नाव गेल्या आठ वर्षांपासून केवळ समस्यांसाठी ओळखले जात आहे. आजही या भागातील मुख्य रस्ता अक्षरशः चिखल-कर्दमात बदलला असून, नागरिकांना पावसाळ्यात दररोज मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

या वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून पक्क्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याचा संपूर्ण भाग उखडलेला असून, रहदारी करणे तर दूरच, पायी चालणे देखील धोकादायक झाले आहे. वाहनधारक, विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या परिस्थितीने हैराण झाले आहेत.

या भागातील नागरिक दरवर्षी नियमीतपणे मालमत्ता कर भरतात. मात्र त्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत. यावर्षी मात्र नागरिकांनी ठाम भूमिका घेत, मालमत्ता कर भरण्यास नकार दिला आहे.
त्यांचा स्पष्ट इशारा आहे की – “जोपर्यंत मजबूत रस्ता तयार होत नाही, तोपर्यंत कोणताही कर भरला जाणार नाही!”

वसाहतीतील रहिवासी संतप्त असून म्हणतात की, “नगरपरिषद केवळ वसुलीपुरतीच कार्यरत असते. नागरी सुविधा, रस्ते, पाणी, गटार या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही.” दरवेळी निवेदनं दिली, तक्रारी केल्या, अधिकारी भेटले, पण आजतागायत काहीच बदल झालेला नाही.

नगरपरिषद प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येते की, “रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, लवकरच काम सुरू होईल.” मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही. तेच आश्वासन, तेच उत्तर आणि तीच निराशा – एवढंच नागरिकांच्या वाट्याला आलं आहे.

या रस्त्यावरून शाळेत जाणारी लहान मुले, दवाखान्याकडे जाणारे रुग्ण, घरगुती कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिला यांना अक्षरशः दररोज संकटांचा सामना करावा लागतो. चिखलात घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही नागरिक तर घरातून बाहेर पडणे टाळू लागले आहेत.

या भागात राहणाऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून त्यांनी माध्यमांद्वारे थेट प्रशासनाला जाब विचारला आहे.”आम्ही नियमीत कर भरतो, मग आमच्यासाठी मूलभूत सुविधा का नाहीत?

धम्मगिरी समोरील माता नगर लेआऊट हा परिसर प्रशासनाच्या दुर्लक्षाची जिवंत उदाहरण बनला आहे. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या नागरी त्रासाला आता नागरिक कंटाळले आहेत.आता त्यांच्या आवाजाला दुर्लक्ष करता येणार नाही.प्रशासनाने तात्काळ या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.