

माझे मित्र डॉ.श्रीकांत पाटील यांनी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘काळच उत्तर देईल’ हा काव्यसंग्रह आवर्जून मला पाठवून दिला. त्यांच्या कवी मनाने निसर्ग आणि समाज यांचे केलेले निरीक्षण, चिंतन आणि मनन यात व्यक्त झाले असून मानवाच्या वागण्याने मानवांवरच ओढवणारी संकटे वाचून मी थक्क झालो. त्यामुळे या पुस्तकाचे परीक्षण लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न.
डॉ.श्रीकांत पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. ते जसे मुलांना शिक्षण देऊन घडवतात तसेच आपल्या साहित्यातून समाज घडविण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी मनापासून विचार मांडतात. नीती, तत्वे, मूल्ये हरवत चाललेल्या माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे; याबरोबरच माणसाने पशु,पक्षी, वेली, झाडे, नदी, नाले, ओढे, डोंगर अर्थात निसर्गाशी माणुसकीने वागावे. निसर्ग आपला सखा, सोबती, गुरु आहे. निसर्ग देव आहे. निसर्गाचे नियम माणसाने पाळायला हवेत. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी निसर्गाची शक्ती फार मोठी आहे. निसर्गनियमाविरुद्ध वागल्याने मानवाने भूतकाळात केलेल्या चुकांचे परिणाम वर्तमान काळातील पिढीला भोगावे लागत आहेत आणि वर्तमानात करत असलेल्या चुकांचे भविष्यातील पिढ्यांना किती गंभीर परिणाम भोगावे लागतील याबाबत अतिशय वास्तव चित्रण त्यांनी आपल्या कादंबऱ्या आणि सर्वच साहित्य प्रकारातून केले आहे.पण सुधारेल तो माणूस कसला? याची प्रचिती येताना दिसत आहे.
डॉ. श्रीकांत पाटील यांचे विपुल साहित्य प्रकाशित आहे. मुख्यतः ते कादंबरीकार म्हणून ओळखले जात असले तरी हळव्या आणि संवेदनशील मनाचे कवी आहेत. आपल्या तत्त्वज्ञानाची आणि विचारांची मांडणी घागरमे सागर भरून ‘काळच उत्तर देईल’ या काव्यसंग्रहातून केलेली आहे.
गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे यांनी सुंदर पुस्तक निर्मिती केली असून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांची अंतकरणापासून लिहिलेली पाठराखण या पुस्तकास लाभली आहे.
कवीने विषयानुरूप ‘हाय हॅलोच्या जमान्यात’, ‘ओल हरवलेली माती’, ‘सातबाराच्या बेड्या’ आणि ‘क्षितिजाच्या पलीकडे’ असे चार विभाग केले आहेत.
‘हाय हॅलोच्या जमान्यात’ या भागात माणूस माणसापासून दूर चालला आहे. माणुसकीचा बेगडी मुखवटा धारण करून वावरतो आहे. त्याच्यातील प्रेम, माया, आपुलकी, माणुसकी आटत चालली आहे. पूर्वी शेकडो मैल दूर असलेली माणसं आपुलकीने सवडीनुसार पायी चालत जाऊन एकमेकांना भेटत होती. जिवाभावाच्या चार गोष्टी बोलून प्रसंगी वाटेल तो त्याग करून नाती मैत्री जपत होती. हल्ली भौतिक सुविधा खूप झाल्या आहेत. दळणवळणांची वेगवान साधने आहेत. माणूस चंद्रावर, मंगळावर जाऊन आला पण जवळच्या माणसापासून दूर गेला. एखाद्याला शेजारचे काका गेलेले चार दिवसांनी कळत असेल किंवा रस्त्याकडेला पडलेला माणूस पाहून वास्तव जाणून न घेता ‘पिऊन पडला असेल’ ‘आपल्याला काय करायचंय’ म्हणून निघून जात असेल तर याला ‘माणूस’ म्हणायचे का? असा प्रश्न पडतो. एकमेकांशी संवाद हरवत चाललेल्या जमान्याची कवीला खंत वाटते. तो लिहितो,
“विसंवादी या जगामध्ये
संवादाचा सूर नाही
विचार थांबले, अबोला झाला
माणुसकीचा सूर नाही” (संवाद हरवत चाललाय-पृष्ठ 42)
या संग्रहामध्ये काही सुंदर निसर्ग कविता आहेत. त्या निसर्ग कविता असल्या तरी प्रतीकात्मक मानवी जीवनाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटले आहे. ‘ओल हरवलेली माती’ कोरडी असते. तिच्यात ओलावा नसतो. त्यामुळे तिच्यामध्ये बिया अंकुरत नाहीत. ती नवनिर्मिती करू शकत नाही. पीक देऊ शकत नाही. माणसाच्या हृदयामध्ये माणुसकीचा ओलावा असायला हवा तरच ती माणुसकीचे पीक देऊ शकते.
निसर्गाचे सुंदर रूप तसेच रौद्ररूप त्यांच्या कवितेत आले आहे. माणसाने डोंगर फोडल्यामुळेच दरड गावावर कोसळते, नदीकाठची झाडे तोडल्यामुळे महापुराचा गावांना तडाखा बसतो, माणसाच्या चुकांमुळेच माणसे, गुरेढोरे, पशुपक्षी यांना निसर्गाच्या रौद्ररूपाशी सामना करावा लागतो. गावच्या यात्रा, गावजत्रा, दिंडी, वारी असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले पाहिजेत. त्यातही ध्वनी प्रदूषणासारखे प्रकार टाळले पाहिजेत. अनेक महापुरुषांनी माणुसकीची शिकवण दिली आहे. त्यांचा आदर्श समोर असावा म्हणून चौकाचौकात पुतळे उभारलेले आहेत.परंतु जाती, धर्मांधतेमुळे त्यांची विटंबना होते. दंगे, जाळपोळ,हाणामाऱ्या होतात हे होऊ नये.
“सारेच महापुरुष होते
मानवतेचे पाईक
त्यांच्या पुतळ्याकडे पाहून
आपण काहीतरी शिकायला हवं
हातात हात घेऊन पुन्हा
एक व्हायला हवं” (पुतळे-पृष्ठ ५१)
शेतकऱ्यांची दैना, त्यांच्या हाल अपेष्टा याविषयी अतिशय मोजक्या शब्दात कवीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘सातबाराच्या बेड्या’ या भागात नेहमीचा दुष्काळ, भेगाळलेल्या भुई पाहून, आकाशात ढग पाहून पाऊस कोसळावा यासाठी बळीराजाचे तळमळणारे मन, त्याचं दुःख, दैन्य, दारिद्र्य याचे चित्रण आहे. शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो पण निसर्गाची अवकृपा त्याला कधीच वर येऊ देत नाही. त्याच्या प्राथमिक गरजा तो पुऱ्या करू शकत नाही. त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्याच्या सातबारावर बँका, सोसायट्या त्याला कर्जाचा विळखा घालतात. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.
“चक्राकार जगण्यात
होतात जगण्याची खळी
सातबारा मागत राहतो
कुणब्याचा बळी” (सातबाराच्या बेड्या- पृष्ठ ७५)
‘क्षितिजाच्या पलीकडे’ या भागात मानवावर येणाऱ्या आवर्षण, अतिवृष्टी, समाजाला लागलेली वाळवी, बांडगुळ, निसर्गाचा कोप, त्सुनामी, बुरंगाट, धरणीकंप, वळीव, झळा, वादळवारा, भिरूड, दरी, वारूळ, पाणीबाणी अशा प्रतीकात्मक कविता आहेत. अनेक संकटे असली तरी माणसाने जगण्यासाठी त्यावर मात केली पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. झाडे लावून ती जगवली पाहिजेत. झाडे, वेली, पशुपक्षी अशा सर्व सजीवांचे रक्षण केले पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश अखेरच्या काही कवितांतून दिलेला आहे.
माणसाच्या चुकांमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.
“आपण आपले अंदाज बांधायचे
हवामान खात्यासारखे
उद्भवणाऱ्या साऱ्या प्रश्नांना
काळच उत्तर देईल” (काळच उत्तर देईल- पृष्ठ-११८)
मानवाने वर्तन सुधारायला हवे, अन्यथा फार मोठी शिक्षा भोगावी लागेल. तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ‘काळच उत्तर देईल’ हे समर्पक शीर्षक आहे.
या संग्रहातील प्रत्येक कविता हा चिंतनाचा स्वतंत्र विषय आहे.
कविता साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या असल्यामुळे तिचा आशयाचे लगेच आकलन होते. माणूस सुधारला नाही तर ‘माणुसकी’ कशाला म्हणायचे? हा प्रश्न पडावा इतके घातक आहे. बहिणाबाईंच्या भाषेत,
“अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस!
तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर!”
माणसापेक्षा ‘जनावरे’ बरी म्हणायची पाळी येईल.
डॉ.श्रीकांत पाटील यांनी कवितेतून दिलेला संदेश सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्यातच माणसाचे सुख अवलंबून आहे.
डॉ.पाटील यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा!
प्रा.भास्कर बंगाळे, पंढरपूर
मो.९८५०३७७४८१






