धान बोनस वाटपासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश!

0
11556
1

१० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार बोनसची रक्कम; हजारो शेतकऱ्यांना दिलासा

गोंदिया : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहणारे खासदार प्रफुल पटेल यांनी पुन्हा एकदा आपली शेतकरीहितैषी भूमिका अधोरेखित केली आहे. प्रलंबित धान बोनससंदर्भात त्यांनी आज राज्याचे वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या चर्चेच्या परिणामी, राज्य शासनाने आज ९०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित रक्कम येत्या १० दिवसांत वितरीत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली असून, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच बोनसची रक्कम थेट जमा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महायुती सरकारने शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र निधी वितरणाची प्रक्रिया रखडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. ही स्थिती लक्षात घेऊन खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.

या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रियेचे श्रेय खासदार प्रफुल पटेल यांच्या तळमळीच्या प्रयत्नांना जात आहे.

शेतीसाठी समर्पित असलेला आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने लढणारा नेता म्हणून प्रफुल पटेल यांनी पुन्हा एकदा आपली जनतेशी असलेली नाळ दृढ केली आहे.