

नालेसफाई, शौचालय, गतिरोधक, रस्त्यावरील खड्डे आणि पीएम आवास योजनेतील रखडलेली कामे मार्गी लावण्याची जोरदार मागणी; जनआंदोलनाचीही चेतावणी
आमगाव, दि. ९ जून : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद आमगाव अंतर्गत नगरातील अनेक मूलभूत नागरी समस्या अद्यापही प्रलंबित असल्यामुळे आज अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने नगर परिषदेला पुन्हा निवेदन देण्यात आले. याआधी दिनांक ९ जून रोजी देखील एक निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आज स्मरणपत्र देत समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनात खालील प्रमुख मागण्या समाविष्ट आहेत:
नगरातील नाले पावसाळ्यापूर्वी त्वरित साफ करण्यात यावेत,
गोंदिया रोडवरील प्रवासी निवाऱ्याजवळ शाळकरी मुली व महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी,
मुख्य रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात यावेत,
सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाले सफाई केली जावी,
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रखडलेल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना तातडीने किस्त देण्यात याव्या,
पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील धोकादायक खड्ड्यांची त्वरित डागडुजी करण्यात यावी.
निवेदन देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. मेश्राम, संघटन मंत्री जगदीश शर्मा, उपाध्यक्ष बी. एम. कटरे, संतोष पुंडकर, नरेंद्र बहेटवार, आणि रमेश लिल्हारे हे प्रमुख उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे त्यांनी नगर परिषदेला सूचित केले की, वरील समस्या तातडीने सोडवल्या गेल्या नाहीत, तर जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व सुविधा यासंदर्भातील या मागण्या अत्यंत न्याय्य असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.






