सालेकसा नगर पंचायतमध्ये आकृतीबंधानुसार पदभरतीसाठी निवेदन सादर

0
375
1

३,६९० वरून ८,८८७ पर्यंत वाढलेल्या लोकसंख्येनुसार पदभरतीची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सालेकसा (१२ जून ) :  सालेकसा तालुक्याचे माननीय तहसीलदार  नरसय्या कोंडागुरले यांना विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभाग, नागपूर यांच्या नावाने एक निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनामध्ये सालेकसा नगर पंचायतमध्ये शासन निर्णयानुसार व नियमानुसार ठरवलेल्या आकृतीबंधानुसार पदभरती तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली.

सालेकसा नगर पंचायतची स्थापना होताना येथील लोकसंख्या ३,६९० इतकी होती. त्या प्रमाणात एकूण १८ पदांची संरचना निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आमगाव खुर्द ही मोठी ग्रामपंचायत सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आली असून सध्याची लोकसंख्या ८,८८७ एवढी झाली आहे.

वाढलेल्या लोकसंख्येनुसार नागरिकांना अधिक चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेली पदभरती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदन सादरीकरण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. अजय उमाटे, शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, डॉ. हिरालाल साठवणे,  बाजीराव तरोने, श्रीमती गीता चौधरी, श्रीमती दुर्गा पटले, योगराज पटले,  किसन रहांगडाले, श्री जितेंद्र बडोल,  बबलू मानकर,  अरुण तावाडे, तसेच  सोनू दसरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवेदनाद्वारे सालेकसा नगर पंचायतमध्ये प्रशासनिक कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Previous articleरिसामा प्रभागात जनतेचा निर्धार यशस्वी
Next articleपद्मश्री चैतराम पवार यांच्या हस्ते ‘पाणी व्यवस्थापन’ ग्रंथाचे प्रकाशन