नात्यांमधला हरवलेला ओलावा…….

0
376
1

लेखक:

✍️ अविनाश शोभाबाई महादेव जुमडे

मो. 9767472340

बालपणाच्या आठवणी म्हणजे काळजाच्या कपाटात जपून ठेवलेलं एक मौल्यवान खजिना. मामाच्या गावच्या सुट्ट्या, आंब्यांच्या झाडाखाली खेळणं, विहिरीवरचा गार पाण्याचा शहारा, आणि रात्री आजीच्या कुशीत ऐकलेली गोष्ट — या सगळ्यात एक नितळ सुख दडलं होतं. त्या काळात नात्यांना एक वेगळीच उब होती — प्रेम, जिव्हाळा, आणि एकमेकांच्या जगण्यातली असलेली नाळ.

आज मात्र, नात्यांमधला तोच ओलावा कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. आयुष्य अधिक वेगवान झालंय, पण नात्यांमधलं ते सुस्पष्ट, निस्सीम प्रेम कुठंतरी मागे पडलंय. आठवतंय मला, मी लहान असताना तिसरीत असेन — माझं गाव दहेगाव आणि मामाचं गाव नांदेपेरा. तिथं जायला 2.50 रुपये लागायचे. त्यासाठी सुट्टीच्या आधीच पैशांची जुळवाजुळव सुरू व्हायची. त्या थोड्याशा पैशांत प्रेम, उत्साह आणि आठवणी खचाखच भरलेल्या असायच्या. आज मुलांकडे बघितल्यावर वाटतं, त्यांचं बालपण मोबाईलच्या पडद्यावरच उरलंय. आज ‘आई’ म्हणजे ‘मम्मी’, आणि ‘आजी’चं अस्तित्व तर गोष्टींच्या पुस्तकापुरतंच मर्यादित झालंय.

आजच्या जगात सोशल मिडियावर हजारो मित्र जोडले जातात, पण गरजेच्या वेळी मदतीला येणारा कोणीच नसतो. फेसबुकवर “Happy Birthday bro!” म्हणणारे खूप असतात, पण संकटात साथ देणारा ‘भाऊ’ कुठे असतो?

कला क्षेत्रातले माझे गुरू, नकलाकार छत्रपती महाकुलकर नेहमी सांगायचे

“याचा गोटा इथून, त्याचा गोटा तिथून, अन् बाप मेला तर न्यायचा कोठून?” ही म्हण आजच्या नातेसंबंधांचं अचूक चित्रण करते. भाऊ भावात दुरावा, आपल्याच माणसांमध्ये बेगडीपणा — आणि कुणी गेले तरी फक्त ‘स्टेटस अपडेट’ पुरतं दुःख!आताची परिस्थिती पाहिली तर, शेजाऱ्यांशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत आहेत — गाडी कुठे पार्क केली, आवाज जास्त झाला, दार उघडं ठेवलं — अशा क्षुल्लक कारणांवरून संवाद तुटतो. आणि समाधान? त्यात काहीच मिळत नाही. उलट मनात राग, कटुता आणि तणाव साठत जातो.पूर्वी सण-उत्सव म्हणजे एकत्र येणं, जेवणावळी, गप्पा, आणि हास्याचे फवारे. आज सण म्हणजे “व्हॉट्सॲप ग्रुपवर शुभेच्छा” आणि “इंस्टाग्रामवर फिल्टर लावलेला फोटो”. आपल्यातले नाते टिकवायला हवे असतील, तर त्या नात्यांना ‘वास्तविक वेळ’ द्यावा लागेल — ‘व्हर्च्युअल वेळ’ नव्हे.या सगळ्या बदलांची अनेक कारणं आहेत — तंत्रज्ञानाचा अतिरेक, शहरीकरण, छोट्या कुटुंबसंस्था, आणि वाढत चाललेला ‘मीपणा’. स्वतःभोवती तयार केलेला हा अदृश्य भिंतींचा कुंपण आज आपल्या माणसांनाच दूर करतंय. संवाद हरवतोय, सहवेदना कमी होतेय, आणि एकमेकांना समजून घेण्याची सवय विसरली जात आहे.पण आपण काहीतरी बदल करू शकतो — आणि करायलाच हवा.आपल्याच माणसांना वेळ द्या. फोनवर नाही — प्रत्यक्ष भेटून. गावाकडच्या मातीला हात लावा. मुलांना आजीआजोबांच्या गोष्टी सांगा. आठवणींमध्ये नात्यांची उब दडलेली असते, ती परत जिवंत करा.पैसा हे साधन असू शकतो, पण माणूस ही खरी संपत्ती आहे.तो विश्वास आणि तो जिव्हाळा कृतीतून दाखवा. तुमचं माणूसपण जपण्यासाठी नात्यांना वेळ, प्रेम आणि समजून घेण्याचं पाणी दिलं, तर हरवलेला ओलावा पुन्हा परत येईल.शेवटी, नाती जपणं म्हणजे जगणं जपणं. कारण माणूस माणसाशी असतो, तेव्हाच त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध होतं.

Previous articleकोरोना काल से बंद ट्रेनों का सफर 15 जुलाई से फिर होगा शुरू !
Next articleठेवीदार, भागधारक व कर्जदारांच्या हिताचे निर्णय घेणार : माजी आमदार भेरसिंग नागपुरे