गोंदिया-बोडुंदा एस.टी. बस सेवा पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर

0
227
1

गोंदिया, (४ ऑगस्ट) : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाणारे एस.टी. महामंडळ ग्रामीण व नागरी भागांना जोडणारे महत्त्वाचे माध्यम आहे. विशेषतः गरीब, शाळकरी मुले, नोकरदार वर्ग व वृद्ध नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत आवश्यक ठरते. याच सेवेतील गोंदिया ते बोडुंदा एस.टी. बस सेवा मागील दोन वर्षांपासून बंद होती, त्यामुळे नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना व गरजू रुग्णांना शहरात येण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते.

सदर सेवा पुन्हा सुरू करावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज गोंदिया आगार व्यवस्थापक  येतीश कटरे यांना अधिकृत निवेदन देण्यात आले. या निवेदनात गावपातळीवरील सरपंचांनीही सहभाग घेतला.

निवेदन देताना देवेंद्र ठाकरे सरपंच, तिमेझरी,धुरपताताई एम. कटरे सरपंच, बोडुंदा,सौ. मनीषाताई चोपकर सरपंच, बोरगाव आदि पदाधिकारी उपस्थित होते.या सरपंचांनी त्यांच्या गावातील नागरिकांच्या समस्या स्पष्ट करत गोंदिया-बोडुंदा सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी आगार व्यवस्थापकांसमोर मांडली.

यावेळी आगार व्यवस्थापक येतीश कटरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “पुढील दोन दिवसांत ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल”, असे आश्वासन देण्यात आले.

या निवेदन कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते  आनंद पटले यांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत लक्ष्मीकांत मिश्रा आणि वीरेंद्र चन्ने हे देखील उपस्थित होते. सर्वांनी मिळून नागरिकांच्या मागण्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या.