ज्येष्ठ नागरिक ठरतात कुटुंब व समाजाचे मार्गदर्शक; आमगावात जेष्ठांचा भव्य गौरव सोहळा !

0
33
1

माजी आमदार भेरसिंह नागपूरे यांचे शासनाच्या धोरणांवर सविस्तर मार्गदर्शन; तीन वयोवृद्ध जेष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते

आमगाव : १ ऑक्टोबर २०२५ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आमगाव येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने आयोजित केलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला वसाहतीतील जेष्ठ नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी बोलताना मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले, तसेच त्यांना कुटुंबात व समाजात सन्मानाची वागणूक देण्याची गरज प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व माजी आमदार भेरसिंह नागपूरे यांनी आपली उपस्थिती नोंदवली. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद सदस्या छबुताई उके, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाचे अध्यक्ष नारायणप्रसाद जमईवार तसेच प्रभाकर वराडे, संजय कटरे आणि महेश उके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अत्यंत आदराने करण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळायलाच हवी. त्यांचा अनुभव व ज्ञान हे समाजासाठी एक अमूल्य ठेवा आहे.
 नागरिकांचे महत्व अधोरेखित करताना म्हटले की, ज्येष्ठ नागरिक कुटुंब आणि समाजाचे मार्गदर्शक ठरतात. त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी शासनाचे धोरण, योजना व हक्कांबद्दल सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे, जि. प. सदस्या छबुताई उके, अध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे आणि प्रभाकर वराडे यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केले.
तत्पूर्वी, समाजात मोठे योगदान देणाऱ्या भैय्यालाल बोपचे, भागरताबाई बोपचे आणि गौरीशंकर गुप्ता या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आमगावचे अध्यक्ष लक्ष्मण खंडाईत यांनी केले. अत्यंत प्रभावीपणे कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य वसंत मेश्राम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सचिव मोहन नेवारे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी नवलभाई गुप्ता, आत्माराम तुमसरे, देवानंद मेश्राम तसेच सदस्य शरद उपलपवार, बी. एम. कटरे, नीलकंठ भुते यांनी सक्रिय सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्र गिताने करण्यात आला.