

शिक्षिका केसर बिसेन यांच्या नाटिकेमुळे संपूर्ण वातावरण झाले ‘गांधीमय’; विद्यार्थ्यांसाठी प्रेरक विचारांची पेरणी
आमगाव : के.के. इंग्रजी प्रायमरी शाळा, आमगाव येथे आज, २ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या श्रीमती रीना भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य श्रीमती रीना भुते यांच्या हस्ते महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून त्यांना आदराने वंदन करण्यात आले.
यावेळी वाकले यांनी आपल्या भाषणात दोन्ही महान नेत्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रभावीपणे प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांबद्दल माहिती देऊन त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले शिक्षिका श्रीमती केसर बिसेन यांनी सादर केलेली महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सुंदर नाटिका. या प्रभावी नाट्य सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण गांधीमय होऊन विद्यार्थ्यांमध्ये गांधी विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली.
प्राचार्य श्रीमती रीना भुते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधी यांच्या जीवनाचे आधारतत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी स्वच्छता अभियान आणि ‘एक पेड माँ के नाम’ यासारख्या सामाजिक उपक्रमांचे महत्त्व समजावून सांगितले.
शिक्षिका श्रीमती सीमा चंद्रकापुरे यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल बोलताना, “मूर्ती लहान, पण कीर्ती महान” कसे त्यांचे जीवन होते, हे प्रभावीपणे पटवून देत विद्यार्थ्यांना साधेपणा व महानतेचा संदेश दिला.
सरतेशेवटी, प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.






