

बाईक रॅलीद्वारे वन्यजीव संरक्षणाचा संकल्प; संघर्षावर मात करण्यासाठी लोकशक्तीचा जागर
आमगाव,(५ ऑक्टोबर) : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणारा ‘वन्यजीव सप्ताह’ यंदा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वनपरिक्षेत्रात एका प्रभावी मोहिमेद्वारे उत्साहात साजरा होत आहे. अलीकडच्या काळात वाढलेल्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जनमानसात वन्यजीव संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, वनपरिक्षेत्र कार्यालय आमगाव यांच्या वतीने आज “मानव-वन्यजीव संघर्ष जनजागृती बाईक रॅली” चे आयोजन करण्यात आले.
आमगाव वनक्षेत्राच्या वनपरीक्षेत्र अधिकारी कु. अभिलाषा सोनटक्के यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही रॅली पार पडली. क्षेत्र सहाय्यक अंजोरा बी. आर. हत्तीमारे, व सर्व वनरक्षक, वनकर्मचारी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक युवक या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमगाव वनपरिक्षेत्र कार्यालयातून रॅलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर ही बाईक रॅली जांभुरटोला, सोनेखारी, वडद, कवडी आणि पानगाव या प्रमुख गावांमधून मार्गक्रमण करत पुन्हा आमगाव वनविभाग कार्यालयात परत आली.
गावोगावी जात असताना, रॅलीतील कर्मचाऱ्यांनी “वन्यजीव वाचवा – निसर्गाचे रक्षण करा”, “मानव-वन्यजीव संघर्ष टाळा” आणि “पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा” अशा आकर्षक घोषणांनी परिसरातील वातावरण प्रबोधनमय केले. प्रत्येक गावामध्ये ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून, वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व आणि माणूस व प्राणी यांच्यातील सह-अस्तित्वाची गरज स्पष्ट करण्यात आली.
या जनजागृती रॅलीद्वारे वनविभागाने नागरिकांना आवाहन केले की, जंगल परिसरात जाताना शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, वन्यजीवांना त्रास देणे टाळावे आणि अन्न किंवा कचरा जंगलात फेकू नये. अन्न आणि मानवी वस्तीचा वास प्राण्यांना आकर्षित करतो, ज्यामुळे संघर्षाची शक्यता वाढते. त्यामुळे, अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसहभाग हाच कळीचा मुद्दा असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभाग आगामी काळात शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, परिसंवाद, चित्रप्रदर्शने आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाची ही ज्योत तेवत ठेवणार आहे.
या सामूहिक प्रयत्नामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना कमी होण्यास निश्चितच मदत मिळेल.






