एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिरोंचा अंतर्गत तालुका स्तरीय महिला मेळावा उत्साहात संपन्न;… सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे महिलांना मोलाचे मार्गदर्शन

0
49
1

सिरोंचा: एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ICDS) सिरोंचा यांच्या वतीने सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जि.प. हायस्कूल सभागृह, सिरोंचा येथे तालुका स्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना आरोग्य, शिक्षण, आणि विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा या मेळाव्यामागचा मुख्य उद्देश होता.दुपारी १२.०० वाजता या मेळाव्याची सुरुवात झाली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष उपस्थिती लाभली.

*तनुश्रीताई आत्राम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन*

आपल्या मार्गदर्शनात तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी महिलांना त्यांच्या मूलभूत हक्कांबाबत जागरूक केले. त्यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, मुलांना चांगले शिक्षण देणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे यावर भर दिला. ‘महिलांनी केवळ गृहिणी न राहता समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित महिलांमध्ये एक नवा उत्साह संचारला.

महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती या तालुका स्तरीय महिला मेळाव्याला परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या विविध सेवा, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण आणि इतर कल्याणकारी योजनांविषयी सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिरोंचाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

हा मेळावा सिरोंचा तालुक्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखीराम कस्तुरे गटविकास अधिकारी… उद्घाटक तनुश्रीताई धर्मरावा आत्राम सिनेट सदस्य, प्रमुख अतिथी अरवली मॅडम,मधुकर कोलोरी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रवी सुलतान,रमेश पानेम, रमेश कोटाला,प्रियंका सोनटक्के,किशोर वझाडे, अशोक बंडावार, यावेळेस डॉक्टर सचिन मडावी वैद्यकीय अधिकारी, जयंत जथाडे महिला बालविकास अधिकारी, सोनाली सुर्वे बाल संरक्षण कक्ष अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले.