

सायबर सुरक्षा जनजागृती सप्ताह
✍️विलास चाकाटे
देवरी, दि.१४ : सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवत आहेत. या मोहिमेचा उद्देश जनसामान्य लोकांपर्यंत आँनलाईन सुरक्षित राहण्यास मदत करणे. डिजिटल जगात सावधगिरी बाळगण्यासाठी हे एक मॉडेल तयार करेल. या मोहिमेचा उद्देश लोकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास मदत करणे आहे.
आजकाल इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. या मोहिमेद्वारे लोकांना सायबर धोक्यांबद्दल माहिती दिली गेली.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलिस स्टेशन देवरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी आज रोजी (दि. १४) ला पोलिस स्टेशन देवरी येथे सायबर सुरक्षा जनजागृती सप्ताह संबंधाने पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व नागरिकांची बैठक घेऊन यांना सायबर सुरक्षा बाबत माहिती देऊन त्यांना त्यांच्या गावातील इतर नागरिकांना सुद्धा त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्याबाबत सूचित करण्यात आले. सदर माहिती संबंधाने पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी सायबर सुरक्षा बाबत तयार केलेले माहिती चित्रण वाटप करण्यात आले. सदरचे माहिती चित्रण पोलीस पाटलांनी त्यांचे गावातील ठळक जागी चिटकवून लोकांना जागृत करण्याबाबत कळविण्यात आले.
तसेच परमवीर चक्र लॉन्स नायक अल्बर्ट एक्का शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी देवरी येथे भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तसेच नागरिकांना ओटीपी फ्रॉड, विवाह संबंधाने आमिष, ऑनलाइन खरेदी करताना आमिषाला बळी पडू नये, व्हिडिओ कॉलिंग करून ब्लॅकमेल करणे, olx व त्यासारखे संकेतस्थळावर कमी पैशांमध्ये वस्तू विक्रीचे आमिष, व्हाट्सअप हॅकिंग कोणत्याही लिंकला उघडू नये, इलेक्ट्रिक बिल न भरल्यामुळे लाईट जाईल अशी खोटी माहिती देऊन फसवणूक करणे तसेच काही पैशाकरिता बँकेचे खाते उघडून व मोबाईल सिम विक्री करणे, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यात आली.
अशा गुन्ह्यांपासून बचाव करिता सायबर साथी ॲप, इस्कॉन मोबाईल ॲप व अँटीव्हायरस मोबाईल मध्ये वापरण्याबाबत सूचित करण्यात आले. त्यांच्यासोबत कुठल्याही ऑनलाइन फसवणूक झाल्यास १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर फोन करून तक्रार करण्याची माहिती देण्यात आली.

