

भंडारा: भंडाऱ्याच्या विकासात कसलाही प्रकारचा अडथळा खपवून घेणार नाही. शहरात स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीच्या कामाला लागा. यात कोणत्याही ठेकेदारांची पाठराखण कराल, तर अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करायला मागे हटणार नसल्याचा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नगर परिषदेत आयोजित आढावा बैठकीत दिला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छते संदर्भात येत असलेल्या तक्रारी संदर्भात त्यांनी आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते आणि यात सोमवारपासून स्वच्छता मोहीम चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शुक्रवारी चार तास चाललेल्या या आढावा बैठकीत शहरातील जल पुरवठा, सिव्हरेज, स्वच्छता, रस्ते दुरुस्तीसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या तक्रारींचा निपटारा तत्काळ करण्याचे निर्देश तर दिलेच, सोबतच शहरातील थांबलेली सिव्हरेज आणि पाणी पुरवठ्याची कामे लवकरात लवकर संपुष्टात आणण्याच्या सूचना केल्या. इतकेच नाही, तर जल पुरवठा आणि सिव्हरेजमुळे ज्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची सुद्धा दुरुस्ती एक आठवड्याच्या आत करण्यास सांगितले. इतकेच नाही, तर आ. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला की, या कामांच्या ठेकेदारांची जो अधिकारी पाठराखण करेल, त्याच्या विरोधातही ते कार्यवाही करण्यास चुकणार नाहीत.
सोमवारपासून स्वच्छता मोहीम युद्ध स्तरावर
शहरात गेल्या काही दिवसांत स्वच्छते संदर्भात तक्रारी भरपूर वाढल्या आहेत. अशात शहरात स्वच्छता कायम राहावी म्हणून आ. भोंडेकर यांनी नगर परिषदेला निर्देश दिले. ज्यात आवश्यकता असल्यास तत्काळ घंटा गाडी विकत घेण्यासोबतच कर्मचारी कमी पडत असतील, तर ‘आउट सोर्स’चे स्वच्छता कर्मी घेण्यास सांगितले. या मोहीम दरम्यान नगर परिषदेत २४ तास सेवा देणारा टोल फ्री क्रमांक सुरू करून, ज्यांच्या क्षेत्रात कचरा गाडी पोहोचत नाही त्यांच्या तक्रारी घेऊन त्याचे निराकरण करण्याची सूचना आ. भोंडेकर यांनी दिली. त्यांनी घोषणा केली की, या मोहीम दरम्यान ज्या वॉर्डचा प्रभाग सर्वाधिक स्वच्छ राहील त्याला आमदारांतर्फे पुरस्कार सुद्धा देण्यात येईल. इतकेच नाही, तर आमदार भोंडेकर यांनी स्वच्छते संदर्भात गांभीर्याने काम करून जो कुणी घरचा कचरा रस्त्यावर टाकतांना आढळेल, त्याच्यावर दंडात्मक कार्यवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिले.






