

गुलाबी थंडीने ‘कडक’ रूप दाखवले; गावाकडील पारावर, चावडीवर आता शेकोटी हाच हक्काचा ‘आधार’ आणि संवादसेतू!
तिरोडा / पोमेश रहांगडाले
नोव्हेंबर महिना सुरू होताच, ज्या ‘गुलाबी थंडी’ची चाहूल अपेक्षित होती, तिने यावेळी थेट कडाक्याच्या थंडीचे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. हवेतील गारठा वाढल्यामुळे आता अनेक भागांमध्ये थंडीची हुळहुळी वाढू लागली आहे. या वाढत्या थंडीपासून बचावासाठी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी ‘शेकोटी’ हा आपला एकमेव आणि हक्काचा आधार शोधला आहे.
शेकोटी : केवळ ऊब नव्हे, तर परंपरा..! : शेकोटी पेटणे हे ग्रामीण भागातील एका जिवंत परंपरेचे प्रतीक आहे. दिवसभर शेतीत आणि कामात गुंतलेली गावे, सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी या शेकोटीच्या भोवती एकत्र येतात. शेकोटीची ही ऊब फक्त शरीरालाच नव्हे, तर माणसा-माणसांमधील संबंधांनाही मिळते.
या शेकोटीभोवती गावकरी, वृद्ध, तरुण आणि लहान मुले वर्तुळाकार बसतात. लाकडी फाट्यांचा मंद, उबदार प्रकाश आणि हलकासा धूर, एक खास वातावरण निर्माण करतो. या वातावरणात मग, राजकारण, शेतीच्या समस्या, नुकतीच झालेली कामे, सरकारी योजना, आणि व्यक्तिगत सुख-दुःखाच्या गोष्टींचा ‘गप्पांचा फड’ रंगतो. थंडीमुळे घराच्या बंदिस्त चार भिंतींमध्ये बसण्याऐवजी, मोकळ्या वातावरणात, सामूहिक ऊब घेत एकमेकांना समजून घेण्याचा हा गावाकडील संस्कृतीचा एक उत्तम ‘संवादसेतू’ ठरतो.
शेकोटीवर हात शेकवून घेतलेला चहा असो वा ज्वारीच्या कणसांची ‘हुरडा पार्टी’, या साऱ्या गोष्टी थंडीच्या दिवसांतील अविभाज्य भाग आहेत. या शेकोट्या ग्रामीण जीवनाची केवळ गरज नसून, सामाजिक सलोख्याचा आणि सामूहिक आनंदाचा ठेवा आहेत.






