

▪️महाटेट परीक्षा 2025 सनियंत्रण समिती सभा
न्यूजप्रभात वृत्तसेवा /धनराज भगत
गोंदिया, दि.11 : जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025 ही दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा मुख्यालयातील एकूण 17 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा नियोजनबध्द व पारदर्शक पध्दतीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीत दिले.
याप्रसंगी उपरोक्त परीक्षेचा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल डोंगरे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्ञानेश्वर दिघोरे, डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले, सदर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, परीक्षेच्या कामकाजात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता बाळगावी. परीक्षा कालावधीत गोपनियता व सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे, सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त असणे. परीक्षा केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वायफाय सिग्नल, ज्यामर इत्यादी उपकरणांना मनाई, परीक्षा केंद्रावर सर्व भौतिक सुविधा, मनुष्य बळाची नियुक्ती, स्वच्छतागृह स्वच्छता, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सोयी सुविधा उपलब्ध असावे. या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असण्याबाबतचे आवश्यक प्रशिक्षण केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांना देण्यात यावे, अशा सूचना यावेळी प्रजित नायर यांनी केल्या.
जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करुन त्यात वरिष्ठ अधिकारी असावेत असेही निर्देश यावेळी दिले. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये म्हणून गोंदिया तहसिल कार्यालयाचे 2 धडक फिरते पथक तयार असण्याचे तहसिलदारांना आदेशित केले. परीक्षा संपल्यानंतर परीक्षेचे साहित्य काळजीपूर्वक जमा करावे. तसेच परीक्षणार्थींनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची व उमेदवारांची माहिती : गोंदिया जिल्हयात महाटेट (MAHATET )२०२५ ही परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा मुख्यालयातील एकूण 17 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रापैकी 16 परीक्षा केंद्रावर सकाळ व दुपार सत्रात परीक्षा होणार असून एका परीक्षा केंद्रावर दुपार सत्रात सदर परीक्षा होणार आहे.
या परीक्षेसाठी पेपर-1 करीता 4169 परीक्षार्थी प्रविष्ट झाले असून पेपर-2 करीता 4299 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत, अशाप्रकारे या परीक्षेला पेपर-1 व पेपर-2 करीता एकूण 8468 परीक्षार्थी प्रविष्ट झालेले आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या परीक्षेचे संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. दिव्यांग परीक्षार्थींना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सूचविले आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.






