

रीवा येथे १७वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न; माजी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
गोंदिया : अखिल भारतीय साहित्य परिषद न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित केलेले १७ वे राष्ट्रीय अधिवेशन मध्यप्रदेशातील रीवा नगरीत ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत भव्य आणि चैतन्यमय वातावरणात नुकतेच संपन्न झाले. भारतीय साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या तीन दिवसीय साहित्यिक महाकुंभाचे उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांच्या शुभहस्ते झाले.
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डा. सुशीलचंद्र त्रिवेदी ‘मधुपेश’ यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर मराठी साहित्य विश्वातील प्रख्यात कादंबरीकार विश्वास महिपती पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून गौरवपूर्ण उपस्थिती होती.
या साहित्यिक महोत्सवात देशभरातून १५०० हून अधिक साहित्यिक, कवी, विचारवंत आणि विद्वान व्यक्तींनी सहभाग घेतला. विविध विषयांवरील चिंतन, सखोल चर्चा आणि राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण यामुळे हे अधिवेशन भारतीय साहित्याच्या इतिहासातील एक संस्मरणीय पर्व ठरले.
नव्या कार्यकारिणीची घोषणा आणि ॲड. कटरे यांचा सन्मान : समाप्ती सत्रात (दि. ९ नोव्हेंबर) परिषदेच्या नव्या त्रैवार्षिक कार्यकारिणीची घोषणा निवर्तमान राष्ट्रीय संघटनमंत्री श्रीधर पराडकर यांनी केली. या वेळी, डा. सुशीलचंद्र त्रिवेदी ‘मधुपेश’ यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्रचना करण्यात आली, तसेच इतर मान्यवरांना विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती मिळाली.
या अधिवेशनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे भारतीय लोकसाहित्याच्या अध्ययन, संवर्धन आणि संकलनासाठी एका विशेष लोकसाहित्य केंद्रीय समितीची स्थापना. या समितीवर संपूर्ण भारतभरातून निवडलेल्या केवळ तीन सदस्यांपैकी, महाराष्ट्रातून कार्यरत असलेले ॲड. लखनसिंह कटरे यांची निवड करण्यात आली आहे. ॲड. कटरे सध्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांताध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
ॲड. लखनसिंह कटरे यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य परिषदेचे नितीन केळकर, बळीराम राठोड, विदर्भ प्रांताचे चंद्रकांत लाखे, सुनील शिनखेडे, सुनील पाडधीकर, खानदेश प्रांताचे संजीव गिरासे तसेच बैतूल (म.प्र.) येथील धर्मेंद्र खवसे आदी साहित्यप्रेमींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






