आमगाव पोलिसांकडून जप्त वाहनांचा ‘खुल्या बाजारात’ लिलाव!

0
995
1

संधी! बेवारस मोटारसायकल स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; १७ नोव्हेंबर रोजी प्रक्रिया पार पडणार.
मालक न मिळालेल्या ३ दुचाकी विक्रीस; बोली लावण्यासाठी ‘या’ अटी व शर्ती लागू

गोंदिया : जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध गुन्हे प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या आणि कायदेशीर प्रयत्न करूनही ज्यांचे मालक मिळू शकले नाहीत, अशा तीन मोटारसायकलचा (दुचाकी) जाहिर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना अटी व शर्तींचे पालन करून स्वस्त दरात वाहन खरेदी करण्याची ही एक उत्तम आणि पारदर्शक संधी आहे.
पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांनी कळविल्यानुसार, पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (१) (ड) अंतर्गत जप्त केलेल्या व कोणीही मालकी हक्क न दर्शवलेल्या या तीन वाहणांची विक्री करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक रीतसर परवानगी मिळविली आहे.
जप्त वाहनांची ही लिलाव प्रक्रिया दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आमगाव पोलीस स्टेशन येथे पार पडणार आहे.

बोली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक खरेदीदारांसाठी खालील नियम आवश्यक आहेत:
▪️ अमानत रक्कम: लिलावात सहभागी होण्यापूर्वी इच्छुक व्यक्तींनी ₹३,०००/- (तीन हजार रुपये) इतकी अमानत रक्कम पोलीस स्टेशनमध्ये अगोदर जमा करणे बंधनकारक आहे. लिलाव प्रक्रिया संपल्यानंतर ही रक्कम परत केली जाईल.
▪️ निवड प्रक्रिया: सर्वाधिक बोली लावणारे इसमच या वाहनांचे मालक ठरतील. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र बोली लावणे आवश्यक आहे.
▪️ तात्काळ पेमेंट: लिलावाची रक्कम निश्चित झाल्यावर, संबंधित खरेदीदारास ती रक्कम तात्काळ जमा करावी लागेल आणि त्यानंतरच वाहने त्वरित त्यांच्या ताब्यात दिली जातील.

ईच्छुक खरेदीदारांनी वरील अटी व शर्तींचे पूर्ण पालन करून निर्धारित वेळेत आमगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक, तिरुपती अशोक राणे यांनी केले आहे.