

▪️लांजी-सालेकसा-देवरीवासीयांचे हक्काचे स्टेशन उपेक्षित; लिफ्ट बंद, रॅम्पवर सामान ओढत जीवघेणा प्रवास ! प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे!
▪️धनराज भगत/न्युज प्रभात वृत्तसेवा
आमगाव: रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत ८ कोटी रुपये खर्चून विकसित झालेले आमगाव रेल्वे स्टेशन, आज रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उपेक्षेचा बळी ठरत आहे. हे स्थानक केवळ आमगावच नव्हे, तर मध्य प्रदेशातील लांजी आणि महाराष्ट्रातील सालेकसा व देवरी या तीन प्रमुख तालुक्यांच्या लाखोंच्या लोकसंख्येसाठी एकमेव महत्त्वाचा रेल्वे संपर्क केंद्रबिंदू आहे.
जबलपूर, रायपूर आणि प्रयागराजसारख्या मोठ्या शहरांशी जोडणीसाठी जबलपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस (११७०१/११७०२) चा थांबा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण आणि भरघोस महसूल देणाऱ्या गाडीला थांबा नसल्यामुळे, शेकडो प्रवाशांना २४ ते २५ किलोमीटर दूर असलेल्या गोंदिया रेल्वे स्टेशनवर जाऊन गाडी पकडण्याची सक्ती होत आहे.
सध्या, आमगावच्या प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी बस किंवा ऑटोने गोंदियापर्यंतचा प्रवास करावा लागतो, ज्यामुळे अतिरिक्त वेळ, पैसा आणि अनावश्यक शारीरिक ‘कसरत’ करावी लागते. गाडी स्वतः आमगाव स्थानकावरून जात असताना ही सक्ती प्रवाशांसाठी अधिक असह्य ठरते.
नागरिकांची कडक आणि प्रबळ मागणी आहे की, आमगावसारख्या महसूल देणाऱ्या आणि मोठ्या लोकसंख्या केंद्रावर या गाडीचा थांबा अत्यावश्यक आहे. रेल्वेने त्वरित या जनहितकारी मागणीचा पुनर्विचार करून घोषणा करावी, जेणेकरून गोंदियापर्यंतचा अतिरिक्त प्रवास करण्याची मजबुरी संपुष्टात येईल.
आधुनिकतेच्या नावाखाली ‘यातना’: लिफ्टचे भवितव्य अधांतरी : एकीकडे रेल्वे आमगाव स्टेशनला ‘अमृत’चा दर्जा देऊन विकासाचे मोठे दावे करत आहे, तर दुसरीकडे मूलभूत सुविधांमध्ये घोर निष्काळजीपणा दिसून येतोय:
▪️ वळणदार रॅम्पची ‘यातना’: फूट ओव्हरब्रिजवर बांधलेले वळणदार रॅम्प, जड सामान घेऊन चालणाऱ्यांसाठी आव्हान असले तरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी ती एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही.
▪️लिफ्टचा अडथळा : प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट बसवण्याचे काम सुरू झाले असले तरी, ती कधी सुरू होणार, याबद्दल रेल्वे प्रशासन मौन बाळगून आहे. जोपर्यंत लिफ्ट सुरू होत नाही, तोपर्यंत हा वळणदार रॅम्प या आधुनिक स्टेशनची सर्वात मोठी त्रुटी राहील.
८ कोटी रुपये खर्च करूनही हजारो प्रवाशांना, विशेषतः वृद्धांना आणि गर्भवतींना वळणदार रस्त्यांवरून संघर्ष करावा लागत असेल आणि महत्त्वाच्या गाड्यांचा थांबा नसेल, तर हा विकास कोणत्या कामाचा? लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या जनहिताच्या मुद्द्यावर त्वरित लक्ष देऊन जबलपुर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा आणि लिफ्टचे त्वरित संचालन सुनिश्चित करण्यासाठी मार्ग मोकळा करावा.
“आमगाव रेल्वे स्टेशनला ‘अमृत स्टेशन’चा दर्जा मिळून ८ कोटी रुपये खर्च झाले, ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. पण, या आधुनिक स्टेशनवर महत्त्वाच्या गाड्यांचा थांबाच नसणे आणि नागरिकांना २५ किमी दूर गोंदियाला जावे लागणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेषतः, जबलपूर-रायपूर इंटरसिटी एक्सप्रेस (११७०१/११७०२) सारखी महसुली गाडी येथे थांबणे अत्यावश्यक आहे, ही जनतेची आणि माझीही मागणी आहे. तसेच, वृद्धांसाठी व गरोदर महिलांसाठी यातनादायी ठरणाऱ्या घुमावदार रॅम्पऐवजी लिफ्टचे काम तात्काळ पूर्ण करून ती कार्यान्वित करावी.”
– नरेश माहेश्वरी
माजी सभापती, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)“आमगाव रेल्वे स्टेशनची ही अवस्था प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक आहे. आमगाव हे चार महत्त्वाच्या तहसीलसाठीचे केंद्र असूनही, महत्त्वाच्या इंटरसिटी एक्सप्रेसचा थांबा नसणे, हा हजारो प्रवाशांवर अन्याय आहे. आम्हां ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गरोदर महिलांसाठी घुमावदार रॅम्प चढणे म्हणजे अक्षरशः ‘सजा’ आहे. लिफ्टचे काम लवकर पूर्ण करून ती त्वरित सुरू करावी. केवळ विकास दाखवू नका, तर तो सुविधांच्या स्वरूपात प्रवाशांना अनुभवायला द्या. अन्यथा, हा ‘अमृत’ विकास आमच्यासाठी निरुपयोगी आहे.”
– अॅड लखनसिंह कटरे,
से.नि.सहकार जिल्हा निबंधक.






