

तिरोडा तालुका संघर्ष समिती अध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा प्रहार पक्षात प्रवेश; निवडणुकीत वाढली चुरस
तिरोडा / पोमेश रहांगडाले
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाच, तिरोडा येथील तिरोडा तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिमूर येथे आयोजित एका सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची भेट घेऊन औपचारिक प्रवेश केला.
या प्रवेशानंतर, तिरोडा तालुका संघर्ष समिती आता येणारी नगरपरिषद निवडणूक प्रहार जनशक्ती पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
▪️प्रवेशाची घोषणा : संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी स्वतः ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचा तिरोडा नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात हा पहिला प्रवेश आहे. यामुळे, आतापर्यंतच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे तिरोडा नगरपरिषदेची निवडणूक आणखीच चुरशीची ठरणार असून, सर्वांचे लक्ष प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगिरीकडे लागणार हे निश्चित!
महाराष्ट्रातील एका मोठ्या पक्षाच्या सहभागाने तिरोड्यातील निवडणुकीचा माहोल पूर्णपणे बदलला आहे. प्रहार पक्ष किती जागांवर निवडणूक लढवतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






