

न्यायमुर्ती आर. एन. जोशी यांचा गोंदिया सत्र न्यायालयाचा निर्णय
गोंदिया (२६ नोव्हेंबर) : विनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरत सुभाष उर्फ मड्या श्रीराम मडावी (वय ४९, रा. डोंगरगाव डेपो, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) यास जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया यांनी ३ वर्षांचा सश्रम कारावास व एकूण रुपये ६,००० दंड अशी शिक्षा सुनावली. निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. आर. एन. जोशी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिला.
दिनांक १९/१०/२०२४ रोजी पीडिता (वय ४५, रा. चांदलमेठा) आपल्या बहिणीकडे जावयास डोंगरगावहून खुर्शीपारकडे एकटी पायी निघाली असता मध्यरस्त्यात आरोपीने तिचा पाठलाग केला. थोड्याच वेळात आरोपी जवळ येऊन नाव व गाव विचारत पीडितेचा हात पकडून झुडपात ओढत नेऊन तिचा विनयभंग केला.
घडलेल्या घटनेची माहिती डोंगरगावातील नागरिकांना होताच त्यांनी त्वरीत हस्तक्षेप करून पीडितेला आरोपीच्या तावडीतून वाचवले व पोलीस पाटील यांच्या मदतीने तिचे संरक्षण केले.
यानंतर फिर्यादीने पो.स्टे. देवरी येथे तक्रार नोंदविल्यानंतर तपास अधिकारी PSI गीता मुळे यांनी तपास पूर्ण करून कलम ७४, ७५(२), ७८(२)(BNS) अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरण सिद्ध करण्यासाठी सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
साक्ष, पुरावे व युक्तीवादाचा विचार करून न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा दिली :
| कलम | शिक्षा | दंड | दंड न भरल्यास |
|---|---|---|---|
| कलम ७४ BNS | २ वर्षे सश्रम कारावास | ₹५,००० | १ महिना अतिरिक्त कारावास |
| कलम ७५ (२) BNS | १ वर्ष सश्रम कारावास | ₹१,००० | १ महिना अतिरिक्त कारावास |
एकूण शिक्षा : ३ वर्षे सश्रम कारावास + ₹६,००० दंड
संपूर्ण प्रक्रियेत पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या देखरेखीत पोलीस हवालदार ब्रिजलाल राऊत यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व सरकारी वकिलांना प्रभावी सहकार्य केले.






