

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आमगाव येथे ‘इच वन टीच वन’ अभियानाचे रणशिंग
आमगाव: भारत देशाच्या संविधानातील लोकशाही, गणराज्य व समाजवाद यांसारख्या अत्यंत मौलिक मूल्यांची महती समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे तालुका अध्यक्ष, प्राचार्य व्ही. डी. मेश्राम यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव येथे आयोजित संविधान जनजागृती मोहिमेअंतर्गत ते बोलत होते.
प्राचार्य व्ही. डी. मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना ‘इच वन टीच वन’ या भूमिकेतून संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांची जनजागृती करण्याचे आवाहन केले. ही जनजागृती मोहीम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने राबवण्यात येत आहे.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य एन.डी. राऊत आणि संघटनेचे विदर्भ सल्लागार संतोष पुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, उपस्थित अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.प्राचार्य एन. डी. राऊत यांनी उद्देशिकेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, २००८ पासून राज्यातील प्रत्येक शाळेत संविधान उद्देशिकेचे वाचन सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दलची जाणीव वाढली आहे.
प्राचार्य मेश्राम यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य या मौलिक मूल्यांची विस्तृतपणे माहिती दिली, ज्यामुळे संविधान म्हणजे नेमके काय, हे विद्यार्थी व शिक्षकांना समजणे अधिक सुलभ झाले.
किक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेत्या कु. सोफिया शेखचा गौरव : याच कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कु. सोफिया शेख हिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कु. सोफियाने राज्यात किक बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल परिसरात सर्वत्र आनंद व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक दुष्यंत मुनघाटे, कु. गजबे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार कु. ए.एन. गजबे यांनी मानले.






