

गोंदिया (दि. 28) : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापनेतील कामगारांना सवलत द्यावी असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, रा. मो. धुर्वे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खणीकर्म विभागाचा दिनांक 28. 11. 2025 चा शासन निर्णय अन्वेय सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृह, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापना व्यवस्थापक मालकांना या शासन निर्णयाद्वारे निर्देशित करण्यात येत आहे की, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 च्या करिता गोंदिया जिल्ह्यातील कामगार मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सवलत देण्यात यावी.
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा नगर परिषद व गोरेगाव व सालेकसा नगरपंचायत तसेच महाराष्ट्र राज्यातील निवडणूक असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतसाठी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता गोंदिया जिल्ह्यात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. कारखाने दुकाने इत्यादीनाही हा निर्णय लागू असेल. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आज स्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स यांनाही शासन निर्णय लागू राहणार आहे.
मात्र, अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित स्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. अशा आस्थापनांना त्याबाबतची पूर्वपरवानगी निवडणूक अधिकारीकडून घेणे बंधनकारक असेल.
मतदानाचा हक्क हा मूलभूत हक्क असून तो हक्क बजावण्यासाठी आस्थापनांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी पाठवून आपली मूलभूत जबाबदारी निभवावी असे आव्हानही सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केलेले आहे.






