

गोंदिया, दि.28 : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर करताच गोंदिया जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित निवडणुकीसाठी मतदान 2 डिसेंबर 2025, तर मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी होईल.
आयोगाच्या 27 नोव्हेंबर 2025 च्या सुधारित आदेशानुसार 1 डिसेंबर सोमवारी रात्री 10 वाजेपासून प्रचार संपुष्टात येणार आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी व निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी भारतीय नागरिक न्याय संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये निर्बंध आदेश जारी केला आहे.
नियमानुसार गोंदिया, गोरेगाव, तिरोडा आणि सालेकसा येथील नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांत रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनीक्षेपक वापरास मनाई राहील. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमणे अथवा फिरणे प्रतिबंधित राहील. मात्र प्रेतयात्रा, विवाह समारंभ किंवा धार्मिक मिरवणुका या निर्बंधातून वगळण्यात आल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.






