हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा !

0
1428
1

११ जहाल नक्षलवाद्यांचे मुदतीपूर्वीच गोंदिया पोलिसांसमोर ‘शस्त्रत्याग’

गोंदिया (२८): भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी दिलेली १ जानेवारी २०२६ ही मुदत धुडकावून, समितीचा प्रवक्ता ‘अनंत’ याच्यासह दरेकसा दलममधील ११ जहाल नक्षलवाद्यांनी शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी गोंदिया पोलिसांसमोर अचानक आत्मसमर्पण केले. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून, ही संघटना पूर्णपणे कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आत्मसमर्पणाच्या वाटाघाटीत माओवाद्यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेनंतर हा निर्णायक बदल झाला आहे.

▪️ वाटाघाटीचे टप्पे: एमएमसीचा प्रवक्ता अनंत याने २४ नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत सुरुवातीला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत मागितली होती.
▪️शासकीय ताकीद: यावर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ‘सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विनाविलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे,’ असे स्पष्टीकरण दिले.
▪️माओवाद्यांचे पत्रक: यानंतर २७ नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करून १ जानेवारी २०२६ रोजी सामूहिक शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दर्शवली होती.
▪️मुदतीपूर्वी आत्मसमर्पण: मात्र, त्यांनी निश्चित केलेल्या तारखेच्या एक महिना आधीच गोंदिया पोलिसांशी संपर्क साधला आणि शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी अनंतसह ११ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
गोंदियाचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, आत्मसमर्पणासंबंधीची सविस्तर माहिती शनिवारी (दि. २९) जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आत्मसमर्पणाच्या निर्णयापूर्वी प्रवक्ता ‘अनंत’ याने जारी केलेल्या पत्रकात ‘पीएलजीए सप्ताह’ न साजरा करण्याचा निर्णय स्पष्ट केला होता. त्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांना संदेश देताना, शस्त्रसमर्पणासाठी सर्वांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, एकत्र निर्णय घ्यावा व वैयक्तिक शरणागती पूर्णपणे टाळावी, असे निर्देश दिले होते. या वाटाघाटीत यापूर्वी शरणागती स्वीकारलेल्या सोनू ऊर्फ भूपती व सतीश यांनी मध्यस्थी करण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती.
नक्षलवाद्यांचा कुख्यात म्होरक्या हिडमा हा काही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ठार झाल्यापासून नक्षलवादी चळवळ पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. हिडमाच्या मृत्यूनंतर संघटना नेतृत्वहीन झाल्यामुळे आणि पोलीस-प्रशासनाच्या वाढत्या दबावामुळेच, १ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पणाची तयारी दर्शवलेल्या ‘अनंत’ने इतक्या जहाल नक्षलवाद्यांसह मुदतीपूर्वीच शस्त्रे ठेवली, हे या चळवळीच्या शेवटच्या टप्प्यातील मोठे संकेत मानले जात आहेत.