प्रशासन ‘झोपेत ‘, नागरिक ‘जागरूक’! रा. म.५४३ च्या ‘काळ’ बनलेल्या रस्त्यासाठी ‘मॉर्निंग ग्रुप’चे ‘श्रमदान यज्ञ’!

0
284
1

▪️५४३ ‘मृत्यूचा महामार्ग’: डोये वाडा, किडंगीपार येथे नागरिकांनी बुजवले जीवघेणे खड्डे; केंद्रीय मंजुरीच्या प्रतीक्षेत पूल-उड्डाणपूल प्रकल्प; दिरंगाईवर संतापाची लाट!

धनराज भगत/ न्युजप्रभात वृत्तसेवा

आमगाव (२ डिसेंबर): आमगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ हा आता विकासाचा नव्हे, तर ‘मृत्यूचा महामार्ग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महामार्गाच्या धोकादायक अवस्थेकडे प्रशासन ‘डोळेझाक’ करत गाढ झोपेत असताना, अखेर स्थानिक नागरिकांनाच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागला आहे. या रस्त्यावरील डोये वाड्याजवळ पडलेल्या एका खोल खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

मंगळवारी (२डिसें)पहाटे ‘मॉर्निंग ग्रुप’च्या उत्साही सदस्यांनी एकत्र येऊन श्रमदान करत हा जीवघेणा खड्डा बुजवला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टाळली. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी मारलेला हा एक चपराकच म्हणावा लागेल.

‘ मॉर्निंग ग्रुप’ची ‘सामाजिक कर्तव्यनिष्ठा’ : डोये वाड्याजवळील मुख्य रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी ५ वाजता राजेश सातनुरकर, नीरज अग्रवाल, सुरेंद्र हत्तीमारे, आकाश रामटेके, मुकेश पडोळे, श्याम पारधी, सोपान जिपकाटे, मेघश्याम बारसे आदी सर्व साथीदारांनी एकत्र येत डस्ट टाकून या खड्ड्याची तात्पुरती दुरुस्ती केली. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या प्रशासनाची उदासीनता समोर असताना, या मंडळींनी पहाटे ५ वाजता श्रमदान करत आपले सामाजिक कर्तव्य निभावले.
किडंगीपार नाल्या जवळ ‘जीवदायी’ पुढाकार : याआधी, १ डिसेंबर रोजी किडंगीपार नाल्याजवळील रस्त्यावरील धोकादायक खड्डे देखील नीरज अग्रवाल, राजेश सातनुरकर आणि नीरज वैरागडे या नागरिकांनी स्वतःच्या हिंमतीवर बुजवले होते. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वारंवार रस्त्यांची डागडुजी करणे, हे प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.
पूल-उड्डाणपुलाचा प्रश्न अनुत्तरित : आमगाव-गोंदिया महामार्गावर, किडंगीपार नाल्याजवळ प्रस्तावित पूल बांधकामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही, तर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. डांबरी आणि काँक्रीट रस्त्याच्या मध्यभागी असलेले खोल खड्डे अपघातांना खुले आमंत्रण देत आहेत.
सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या मान्यतेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, दिल्ली येथे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. ‘मंजुरी प्राप्त झाल्यावर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात कामास सुरवात होईल,’ असे संकेत मिळत असले तरी, कामाची निश्चित तारीख अजूनही गुलदस्त्यात आहे.
याचसोबत, किडंगीपार येथील रेल्वे फाट्यावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार, हा स्थानिकांचा मुख्य सवाल आहे. रेल्वे फाटकात वाहतुकीची कोंडी झाल्यास वाहनधारकांना तब्बल २० ते २५ मिनिटे ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी, आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिकांना गोंदियाला वेळेत पोहोचता येत नाही, ज्यामुळे अमूल्य वेळ वाया जातो आणि अनेकदा रस्त्यातच रुग्णाला जीव गमवावा लागल्याचे कटू अनुभव नागरिक व्यक्त करतात.
रस्ता सुधारणा आणि पूल बांधणीचे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा या जीवघेण्या मार्गावर मोठी दुर्घटना अटळ आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी निष्क्रिय प्रशासनावर राहील!
रस्ता उद्ध्वस्त, पूल नाही आणि उड्डाणपुलाच्या केवळ आशेवर प्रवास — जीव धोक्यात असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे, तर नागरिक ‘श्रमदान’ करत रस्त्यांची डागडुजी करण्याची वेळ आली आहे.

“केवळ आश्वासने ऐकून आम्ही कंटाळलो आहोत. नागरिक स्वतः खड्डे बुजवत आहेत, याचा अर्थ प्रशासनाला लोकांच्या जीवावर काही देणेघेणे नाही. रेल्वे फाटकावर २०ते २५ मिनिटे थांबावे लागते, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही. आम्हाला त्वरित काम हवे आहे; अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करू, कारण आता संयम संपला आहे!”
– राजेश सातनुरकर, नागरिक